*प्रवासा दरम्यान सोबत घेऊन जाण्यासाठीचे पदार्थ ........*
*मुगडी*
*साहित्य :-*
1 वाटी मुगाचे पीठ, 2 वाट्या कणीक, अर्धी वाटी चणा डाळीचे पीठ, 3 लहान चमचे लाल तिखट, आवडीप्रमाणे मीठ, 2 चहाचे चमचे धने-जिरेपूड, 2 मोठे चमचे पिठी (तांदळाचे पीठ), तळलेली मुगडी हवी असल्यास तेल (ऐच्छिक)
*कृती :-*
प्रथम कणीक, मुगाचे पीठ, चण्याचे पीठ एका तसराळ्यात एकत्र करावे. मग त्यात चवीनुसार तिखट, मीठ व धने-जिरेपूड आणि 2 चहाचे चमचे तेल घालून पोळीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावे. हे भिजवलेले पीठ 2-3 तास झाकून बाजूला ठेवावे. *(फूड प्रोसेसरमधून भिजवल्यास उत्तम)* आता या पिठाच्या अगदी पातळ पोळ्या लाटाव्यात. *(जरुर वाटल्यास पिठी लावावी.)* या पोळ्या मंदाग्नीवर खाकरे भाजतात, तशा स्वच्छ पांढऱ्या फडक्याने किंवा लाकडी मुळीने फिरवून फिरवून खरपूस भाजाव्यात व कागदावर पसराव्यात. गार झाल्यावर मुगड्यांची चळत प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून पिशवी सील करावी. मुगड्या प्रवासात जाताना सोईच्या पडतात. चांगल्या 8 ते 10 दिवस टिकतात. या मुगड्या खाताना बरोबर छुंदा वा तिखट गोड चटणी व दही घ्यावे. 2-3 मुगड्यांनी, चहा-कॉफीबरोबर खाल्ल्यास पोट भरते.
*बाजरी अथवा ज्वारीची पुरी*
*साहित्य :-*
4 ते 5 वाट्या बाजरी अथवा ज्वारीचे पीठ, 4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, पाऊण वाटी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडी हिंगपूड, 3 चहाचे चमचे भाजलेले तीळ, 3 मोठे तेलाचे कडकडीत मोहन, 4 चमचे घट्ट दही आणि तळण्यासाठी तेल.
*कृती :-*
प्रथम मिरच्या - लसूण - कोथिंबीर वाटून घ्यावी. आता पिठात सर्व साहित्य घालून थोडे पाणी घालून, पीठ भाकरीप्रमाणे भिजवून, खूप मळावे. मग त्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या पोळपाटावर वा जाड प्लॅस्टिकवर थापून कढईत मंद आचेवर तळाव्यात. या पुऱ्या पोटभरीच्या असून, 6-7 दिवस छान टिकतात.
*कोथिंबिरीची पोळी*
*साहित्य :-*
कोथिंबिरीच्या 3 मोठ्या जुड्या, 3 ते 4 वाट्या कणीक, 2 मोठे चमचे चणा डाळीचे पीठ, 8-10 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आले, चवीप्रमाणे मीठ, 1 चहाचा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, 2 चहाचे चमचे तीळ वा खसखस, 1 वाटी तेल वा वनस्पती तूप, मसाला परतण्यास 2 चमचे तेल.
*कृती :-*
प्रथम कोथिंबीर चांगली निवडून, स्वच्छ धुवून, निथळून खूप कोरडी करावी. आले - लसूण - मिरच्या, तीळ वा खसखस भाजून वाटून घ्यावे. त्यातच जिरेपूड घालावी. आता थोड्या तेलावर कोथिंबीर चुरचुरीत होईतो परतावी. मग त्यात वाटलेला मसाला व चवीला मीठ घालून पुन्हा परतावे. डाळीचे पीठ थोड्या तेलावर खमंग भाजून वरील मसाल्यात घालावे. चांगले कालवून हा बाकर एका बोलमध्ये ठेवावा.
कणकेत 2 मोठे चमचे तेल व चवीला मीठ घालून पीठ घट्ट भिजवावे. 2-3 तास झाकून ठेवावे. आता करतेवेळी पोळीसाठी घेतो तेवढा कणकेचा गोळा घेऊन हाताने वाटीचा आकार करावा अगर छोटी पुरी लाटावी व त्याची वाटी करावी. त्यात सुमारे दीड-दोन चहाचे चमचे कोथिंबिरीचा बाकर भरावा. कडा जुळवून गोल कचोरीसारखी गोळी वळावी. हलक्या हाताने पिठावर पोळी लाटून पराठ्याप्रमाणे तेल वा तूप सोडून भाजावी. या कोथिंबिरीच्या पोळ्या 6-7 दिवस छान टिकतात. स्वादिष्ट लागतात.
*गोड पराठा*
*साहित्य :-*
4 वाट्या कणीक, चवीला मीठ, 5 चहाचे चमचे तेल, अर्धी वाटी लोणकढे तूप (पातळ असावे), दीड ते 2 वाटी पिठी साखर, 1 वाटी तांदळाची पिठी, अर्धी वाटी कोणतेही वनस्पती तूप किंवा रिफाईंड तेल
*कृती :-*
प्रथम कणकेत तेल व मीठ घालून नेहमीप्रमाणे कणीक भिजवावी. दोन तासांनंतर पराठे करण्यास घ्यावेत. साध्या पोळीच्या दीडपट कणकेचा उंडा घ्यावा. तळहातापेक्षा मोठी अगर फुलक्याच्या आकाराइतकी पोळी लाटावी. त्यावर पातळ तुपाचा हात फिरवावा. तुपावर 2 चहाचे चमचे पिठीसाखर घालावी. हाताने सारखी सारवावी. साखर भरपूर असावी. घडीच्या पोळीला अर्धी पोळी दुमडतो, त्याऐवजी चारी बाजूंच्या गोलसर कडा आत जरा दुमडाव्यात अगर वळवाव्यात व पोळीची गोल गुंडाळी करावी. गुंडाळीच्या दोन्ही टोकाकडून घडी घालावी व पुन्हा घडी घालून हा चौकोन अतिशय हलक्या हाताने पिठीवर लाटावा. जाडसर पराठा लाटून तव्यावर भाजावा आणि दोन्ही बाजूंना थोडे तेल वा तूप सोडून चुरचुरीत परतावा. हे पराठे कागदावर मांडून ठेवावेत. एकावर एक ठेवू नयेत. वाफेने ओलसर होतात म्हणून. गार झालेले सर्व पराठे प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून पिशवी सील करावी. हे पराठे खूपच छान लागतात व पोटभरीचे आहेत. 6-7 दिवस छान टिकतात.
*मॅजिक पावडरचे लाडू (पौष्टिक)*
*साहित्य :-*
300 ग्रॅम जवस, 1 वाटी भाजलेले दाणे, 1 वाटी भाजलेले तीळ, अर्धी वाटी भाजलेला गोटा खोबरे कीस, 10-12 सालासह बदाम, 5-6 अक्रोडाचे 2 भाग, 1 लहान वाटी मगज (भोपळ्याच्या बिया) वा खरबुजाच्या बिया, 10-12 सालासह वेलदोडे, 1 वाटी मोड आणून भाजलेली नाचणी, 100 ग्रॅम बत्तासे, 100 ग्रॅम खडीसाखर, 150 ग्रॅम गुळाची पावडर, पाव वाटी पातळ साजूक तूप
*कृती :-*
प्रथम तूप सोडून सर्व साहित्य एकत्र करावे. मग हे साहित्य मिक्सरमध्ये अगदी बारीक दळावे. सर्व मिश्रण एकजीव करावे व त्यात गरम तूप घालून मध्यम आकाराच्या लिंबाएवढे त्याचे लाडू वळावेत. हे पौष्टिक लाडू खूप दिवस चांगले राहतात. सकाळी न्याहारीच्या आधी 1 लाडू खावा. जवस हे तब्येतीला खूप चांगले आहे. कारण यात ओमेगा 3 हे जीवनसत्त्व आहे. ते शरीराला ऑक्सिजन पुरविते. यातील जवस भाजायचे नाहीत. नाहीतर ओमेगा 3 नष्ट होते. 1 लाडू पुरेसा आहे.
*कसुरी मेथीच्या नमकीन पुऱ्या*
*साहित्य :-*
पाव किलो मैदा, 1 मोठा चमचा कसुरी मेथी, 2 चहाचे चमचे तीळ व तेवढाच ओवा हातावर खरडून घ्यावा. आवडीप्रमाणे तिखट-मीठ, तळायला तेल 3 वाट्या, तसेच 7 मोठे चमचे मोहनासाठी तेल
*कृती :-*
प्रथम मैदा चाळून घ्यावा. मग तो एका तसराळ्यात ठेवावा. त्यात तेलाचे कडकडीत गरम मोहन घालावे. तसेच तिखट - मीठ, तीळ व ओवा त्यात घालावा. मग मैद्याला हे सर्व तेलासह चांगले चोळावे. कसुरी मेथी चुरून घालावी. आता मैदा पाण्याने अगदी घट्ट भिजवावा व 2 तास झाकून ठेवावा. या गोळ्याचे 4 ते 5 सारखे भाग (गोळे) करावेत. 1 गोळा घ्यावा व त्याची ओट्यावर (तेल लावून) मोठी पोळी लाटून, लहान वाटीने सारख्या आकाराच्या पुऱ्या लाटाव्यात व मध्यम आचेवर बदामी रंगावर खमंग तळाव्यात. त्या कागदावर टाकाव्यात म्हणजे जास्तीचे तेल कागदाला लागेल. या पुऱ्या खुसखुशीत व चविष्ट लागून 10-12 दिवस छान राहतात.
*चटकदार भडंग*
*साहित्य :-*
200 ग्रॅम चुरचुरीत भडंग, 1 मोठा चमचा मेतकूट, आवडीप्रमाणे तिखट - मीठ, 1 मोठा चमचा तेल, 2 लसूण पाकळ्या, अर्धी वाटी तिखट शेव, पाव वाटी खारी बुंदी, 1 मूठभर खारे दाणे, 1 मूठभर तडकी चणाडाळ किंवा मुगाची डाळ.
*कृती :-*
प्रथम एका मोठ्या पातेल्यात तेल तापवून, त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या बदामी रंग येईतो परताव्यात. मग गॅस बंद करून त्यात बाकीचे सर्व साहित्य घालून चांगले एकजीव करावे. अगदी 2 मिनिटे परतावे व गार झाल्यावर प्लॅस्टिकच्या पिशवीत वा घट्ट झाकणाच्या पिशवीत भरावे. ही चटकदार भडंग भेळ खूपच छान लागते व खूप दिवस टिकते.
टीप आयत्या वेळी या भेळीत बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर तसेच लिंबाचा रस घातला तर तिची लज्जत वाढते.
*गूळदाणी (गुडदाणी)*
*साहित्य :-*
पावकिलो तांबूस रंगावर भाजलेले व साल काढलेले शेंगदाणे, दीडशे ग्रॅम चांगला गूळ, 1 मोठा चमचा साजूक तूप
*कृती :-*
शेंगदाण्याचे नाक काढून त्यांचे दोन भाग (अर्धे दाणे) करावेत. कल्हईच्या पातेल्यात तूप घालून ते मंद आचेवर ठेवावे. तूप वितळले, की त्यात चिरलेला गूळ घालून तो चांगला विरघळला, की 2 मिनिटे ढवळावा. 1-2 बुडबुडे आले, की गॅस बंद करून पातेले खाली घेऊन त्यात लगेच दाणे घालावेत व गुळात मिसळून लगेच तूप लावलेल्या "ट्रे'मध्ये मिश्रण पसरावे व ताबडतोब धारदार सुरीने वड्या कापाव्यात. त्या लगेच गार होतात. ही गुडदाणी बरेच दिवस टिकते. खायला खूप खमंग लागते. गुडदाणी पॅकबंद डब्यात ठेवावी.
*नाचणीच्या पिठाच्या सोप्या वड्या*
*साहित्य :-*
2 वाट्या नाचणीचे पीठ, 2 वाट्या अगदी बारीक चिरलेला गूळ, 4-5 वेलदोड्यांची पूड, 1 मोठा चमचा देशी तीळ, 2 मोठे चमचे साजूक तूप.
*कृती :-*
प्रथम तुपावर नाचणीचे पीठ भाजून घ्यावे. पीठ भाजत आले, की त्यातच तीळ टाकून जरा भाजावेत. मग पातेले खाली उतरवून मिश्रण गरम आहे, तोवरच त्यात गूळ व वेलची-पूड घालून हलवावे. तूप लावलेल्या "ट्रे'मध्ये हे गरमागरम मिश्रण ओतून लगेच 5 मिनिटांत वड्या कापाव्यात. या वड्या करताना पाक करण्याची जरुरी नाही. फक्त गूळ मात्र छान बारीक चिरलेला हवा. खूप दिवस टिकतात.
*ड्रिंकिंग चॉकलेटच्या वड्या*
*साहित्य :-*
1 वाटी ड्रिंकिंग चॉकलेट, 1 वाटी दुधाची पावडर, 1 वाटी साखर, 1 चहाचा चमचा साजूक तूप.
*कृती :-*
प्रथम चॉकलेट पावडर व दुधाची पावडर 2 वेळा मैद्याच्या चाळणीने एकत्र चाळून घ्यावी. ती झाकून ठेवावी. मग एका पातेल्यात साखर घालून, तूप घालावे व साखर बुडेल इतपत गार पाणी घालून मंद आचेवर साखर विरघळावी. ती एकसारखी ढवळावी. चांगला पाकाचा मोती उभा राहील इतपत पाक तयार करावा. पाक अगदी परफेक्ट झाला पाहिजे. मग लगेच पातेले उतरवून त्यात चाळलेल्या मिश्र पावडरी घालावयात. भराभर ढवळावे. पाक व पावडरी एकजीव झाल्या, की मिश्रण तूप लावलेल्या "ट्रे'मध्ये ओतावे. मिश्रण सेट झाले, की छान चौकोनी वड्या कापाव्यात. या चॉकलेट वड्या 7-8 दिवस चांगल्या टिकतात.
*खारे दाणे (शेंगदाणे)*
*साहित्य :-*
अर्धा किलो दाणे, 1 चमचा मीठ
*कृती :-*
प्रथम मिठात थोडेसे पाणी (साधारण 2 चमचे) घालून, थोडे ढवळून एका वाटीत तयार ठेवावे. दाण्यांना थोडे साधे पाणी चोळून लावावे. मग ते मध्यम आचेवर भाजावेत. *(शक्यतो नॉनस्टिक कढई व पॅन घ्यावे.)* भाजताना सतत एकसारखे हलवावे. दोन-तीन दाण्यांची साले काढून पाहावे. चांगले तांबूस व खमंग भाजले गेले असतील तर लगेच त्या दाण्यांना वरील मिठाचे पाणी चोळावे. दाणे गरम असल्याने सर्व पाणी शोषून घेतात व दाणे पांढरे दिसू लागतात. अगदी विकतच्या दाण्याप्रमाणे लागतात. खूप टिकतात.
*राजगिरा पिठाचे लाडू*
*साहित्य :-*
200 ग्रॅम राजगिरा पीठ, 250 ग्रॅम गुळाची पावडर, 1 वाटी साजूक तूप, *(तूप लाडू वळायला लागेल तसे घ्यावे.)*
*कृती :-*
प्रथम पातेल्यात तूप घालून ते वितळल्यावर त्यात राजगिरा पीठ घालावे. पीठ एकसारखे चांगले भाजावे. मग त्यात गुळाची पावडर घालून ढवळावे. मिश्रण चांगले एकजीव झाले, की ते कोमट असतानाच मध्यम आकाराचे लाडू वळावेत. लाडू खूप खमंग लागतात, टिकतातही खूप दिवस.
*मक्याच्या लाह्या*
*साहित्य व कृती :-*
बाजारात पॉपकॉर्नसाठी वेगळे मक्याचे दाणे मिळतात. त्यातले आपल्या जरुरीप्रमाणे आणावेत.
एका मोठ्या पितळेच्या कल्हई केलेल्या पातेल्यात 1 चमचा तेल घालावे. तेल गरम झाले, की त्यात थोडीशी हळद घालावी व 1 चमचा मक्याचे दाणे टाकून लगेच झाकण ठेवावे. झाकण पातेल्याच्या मापाचे असावे. नंतर लाह्या फुटल्याचा आवाज येऊ लागला, की फडक्याने पातेले धरून चांगले अवसडावे व पुन्हा गॅसवर ठेवावे. पुन्हा लाह्या फुटल्याचा आवाज येईल. 1-2 वेळा पातेले टॉस करून खाली उतरवावे. लाह्या फुटलेल्या दिसतील. या लाह्या ताटात ओतून घ्याव्यात. जेवढे पॉपकॉर्न हवे असतील, तेवढ्या लाह्या फोडाव्यात. नंतर त्याला मीठ व तिखट आवडीप्रमाणे लावावे. थोड्या श्रमांत भरपूर पॉपकॉर्न खायला मिळतात. या लाह्या एअर टाईट डब्यात ठेवाव्यात म्हणजे मऊ न पडता खूप दिवस टीकतील
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.