Monday, January 15, 2018

Archus collection of Masale - Spice Mix

Source - Whatsapp
मसालेदार....चटकदार....मसाले.

@  विविध प्रकारचे मसाले. @

विविध प्रकारचे मसाले भारतीय पाकसिद्धीला "चवीचे लेणे'' देऊन जातात. विशिष्ट पदार्थांसाठी विशिष्ट मसाले, हे आजचे समीकरण घराघरातून काटेकोरपणे पाळले जाते. व्यक्ती तितक्‍या प्रकृती, या उक्तीप्रमाणे घराघरांप्रमाणे मसाल्यातही वैविध्य आढळते. प्रत्येकाची स्वतंत्र पाकशैली असते. स्वतःची अशी खासीयत असते.


1) गोडा मसाला (काळा मसाला).

* साहित्य :-
धणे अर्धा किलो, सुके खोबरे पाव किलो, तीळ पाव किलो, खसखस 50 ग्रॅम, हळकुंडे 50 ग्रॅम, प्रत्येकी 20 ग्रॅम लवंग, दालचिनी, शहाजिरे, काळे मिरे, तमालपत्र, मसाला वेलदोडे, दगडफूल, खडा हिंग, प्रत्येकी 10 ग्रॅम जायपत्री, बाद्यान (बदामफूल), जिरे 100 ग्रॅम.

* कृती :-
खोबरे तुकडे करून वा किसून भाजून घ्या. तीळ कोरडेच भाजून घ्या. बाकीचे सर्व पदार्थ थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्‍सरवर बारीक पूड करा. चाळून घट्ट झाकणाऱ्या बरणीत भरा.


2) पंजाबी गरम मसाला.

* साहित्य :-
1 टी स्पून धणे, अर्धा टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 4 ते 5 तमालपत्रे, अर्धा टी स्पून दालचिनी, अर्धा टी स्पून काळे मिरे, अर्धा टी स्पून लवंग, 5 मसाला वेलदोडे व पाव जायफळ.

* कृती :-
जायफळ सोडून सर्व मसाला कोरडाच भाजून घ्या. (फार भाजू नका.) नंतर जायफळासहित मिक्‍सरवर पूड करून घ्या. टीप - हा मसाला एकदम जास्त प्रमाणात न करता लागेल तसा थोडाच करावा.


3) कांदा लसूण मसाला.

* साहित्य :-
2 ते 3 कांदे, 15-20 लसूण पाकळ्या, 150 ग्रॅम धणे, 150 ग्रॅम सुक्‍या मिरच्या, 2 ते 3 दालचिनी, 2 हळकुंडे, 1 टी स्पून लवंगा, 10-12 तमालपत्रे, 10 मसाला वेलदोडे, 1 टी स्पून काळे मिरे, 5 टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 10 ग्रॅम दगडफूल, 5 ग्रॅम बाद्यान, 5 ग्रॅम नागकेशर, 5 टी स्पून खसखस व 100 ग्रॅम तीळ.

* कृती :-
वरील सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर एकत्र करून मिक्‍सरवर बारीक करा. (विविध प्रकारच्या रसभाज्या व मांसाहारी पदार्थांसाठी उपयोगी.)


4) स्पेशल गरम मसाला.

* साहित्य :-
पाव किलो काळे मिरे, 100 ग्रॅम खसखस, 50 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम लवंग, 100 ग्रॅम बडीशेप, 4-5 मसाला वेलदोडे, 4-5 हिरवे वेलदोडे, 2 ग्रॅम दगडफूल, अर्धे जायफळ, 2 ते 3 बाद्यान (बदामफुले).

* कृती :-
सर्व साहित्य कोरडेच वेगवेगळे भाजून घ्या व पूड करून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.


5) मालवणी मसाला.

* साहित्य :-
अर्धा किलो धणे, प्रत्येकी 10 ग्रॅम दालचिनी, लवंगा, बाद्यान, नागकेशर, तमालपत्रे, जिरे, मोहरी, काळे मिरे, बडीशेप, 4-5 मसाला वेलदोडे, 5 ग्रॅम जायपत्री, 5 ग्रॅम शहाजिरे.

* कृती :-
सर्व साहित्य थोड्या तेलावर भाजून घेऊन त्याची बारीक पूड करून ठेवा.


6) कोकणी मसाला.

* साहित्य : -
पाव किलो लाल सुक्‍या मिरच्या, पाव किलो धणे, प्रत्येकी 10 ग्रॅम लवंगा, जिरे, काळे मिरे, मोहरी, प्रत्येकी 5 ग्रॅम दालचिनी, जायपत्री, शहाजिरे, मेथीदाणे, अर्धी वाटी खसखस, अर्धे जायफळ, 25 ग्रॅम बडीशेप.

*कृती :-
वरील सर्व साहित्य कोरडेच भाजा व बारीक पूड करून बरणीत भरून ठेवा.


7) कच्चा मसाला.

* साहित्य :-
अर्धी वाटी धणे, पाव वाटी जिरे, 5 ग्रॅम शहाजिरे, 5 ग्रॅम लवंग व दालचिनीचा 1 छोटा तुकडा.

* कृती :-
सर्व साहित्य कच्चेच मिक्‍सरवर बारीक करून घ्यावे व ही पूड मसालेभात व खिचडी यासाठी वापरावी.


8) चहाचा मसाला.

* साहित्य :-
150 ग्रॅम सुंठ, 50 ग्रॅम काळे मिरे, 25 ग्रॅम लवंग, 25 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम हिरवे वेलदोडे व 1 जायफळ.

* कृती :-
वरील सर्व साहित्य किंचित भाजून गार करा व मिक्‍सरवर बारीक करा.


9) दूध मसाला.

* साहित्य :-
बदाम 50 ग्रॅम, पिस्ते 50 ग्रॅम, काजू 25 ग्रॅम, चारोळी 25 ग्रॅम, 15-20 केशराच्या काड्या, अर्धे जायफळ, 1 टेबलस्पून वेलदोड्याची पूड.

* कृती :-
वरील साहित्याची बारीक पूड करा व दूध, बासुंदी, खीर, श्रीखंड इ. पदार्थांसाठी वापरा.


10) सांबार मसाला.

* साहित्य :-
धणे पाव किलो, जिरे 100 ग्रॅम, चणा डाळ 100 ग्रॅम, उडीद डाळ 100 ग्रॅम, 1 टी स्पून काळे मिरे, हळद 2 टी स्पून, सुक्‍या मिरच्या 50 ग्रॅम, पाव वाटी कढीपत्त्याची पाने, अर्धा वाटी सुके खोबरे.

* कृती :-
प्रथम डाळी वेगवेगळ्या भाजून घ्या. (करपू देऊ नका.) उरलेले सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. थंड झाल्यावर सर्व एकत्र करून मिक्‍सरवर बारीक करा व हवाबंद बरणीत भरून ठेवा.


11) पावभाजी मसाला.

* साहित्य :-
लाल सुक्‍या मिरच्या 50 ग्रॅम, धणे 50 ग्रॅम, 15-20 हिरवे वेलदोडे, 15-20 लवंगा, 7-8 तमालपत्रे, जिरे 20 ग्रॅम, काळे मिरे 10 ग्रॅम, बडीशेप 20 ग्रॅम, आमचूर पावडर चार टी स्पून, काळे मीठ 2 टी स्पून, हळद 2 टी स्पून, सुंठ पावडर 2 टी स्पून.

* कृती :-
सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. मिरच्या थोड्या तेलावर भाजून घ्या. गार झाल्यानंतर एकत्र करून बारीक करून घ्या व कोरड्या स्वच्छ बरणीत भरून ठेवा. (कधी कधी बदल म्हणून नेहमीच्या भाज्यांमध्येही वापरता येतो.


12) चाट मसाला.

* साहित्य :-
दोन टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून शहाजिरे, 2 टेबलस्पून काळे मिरे, 2 टेबलस्पून बडीशेप, अर्धा टी स्पून हिंग पूड, 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 2 टी स्पून काळे मीठ, चवीनुसार साधे मीठ.

* कृती :-
हिंगपूड थोडी तेलावर परतून घ्या. बाकी सर्व पावडरी सोडून इतर साहित्य किंचित भाजून घ्या व एकत्र करून गार झाल्यावर मिक्‍सरवर बारीक करा. (फ्रूटचाट अगर सॅलडसाठी वापरा.)

आवडले का मसाले मिञांनो...आवडलेच असतील...😀

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.