*संक्रांत स्पेशल रेसिपीज*
*१)तिळाचे लाडु*
साहित्य:
१) पावकिलो पॉलिश तीळ
२) १ मोठा किसलेले सुके खोबरे
३) १ वाटी शेंगदाणे
४) पावकिलो चिकीचा गूळ
५) वेलची पूड
६) १ छोटा चमचा तूप
कृती:
तिळ मंद गॅसवर भाजून घ्यावे.
तडतडू लागले की उतरावे.
सुके खोबरे थोडेसे भाजून घ्यावे.
शेंगदाणे भाजून सोलुन घ्यावे व जाडसर कुटुनघ्यावे.
तीळ, खोबरे, शेंगदाणे एकत्र करून बाजूला करूनठेवावे.
एका पातेल्यात थोडेसे तूप घालून त्यावर गूळघालावा पाणी घालू नये.
मंद गॅसवर पातळ होवू द्यावा.
एका वाटित पाणी घेऊन २-३ थेंब पाकाचे घालावे.
गोळी झाली की पाक झाला असे समजून त्यातएकत्र केलेले सर्व सामान घालून घ्यावे.
वेलची पूड घालून एकत्र करून घ्यावे.
तळ हाथाला थोडेसे तूप लावून मिश्रण गरमअसतानाच लाडू वळून घ्यावे.
थंड झाले की तयार लाडू हवाबंद डब्ब्यात भरूनठेवावे.
*२)तिळाच्या वड्या*
साहित्य:
१/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
१/२ कप किसून भाजलेले सुके खोबरे
१/२ कप तिळ
पाऊण कप किसलेला गूळ
१/२ टेस्पून तूप (साधारण २ टिस्पून)
१/२ टिस्पून वेलचीपूड
सुकामेवा
कृती:
१) तिळ मध्यम आचेवर कोरडेच भाजून घ्यावेत. आणि मिक्सरमध्ये अगदी काही सेकंद फिरवावे. तिळाची पूड करू नये, तिळ अर्धवट मोडले गेले पाहिजेत.
२) वड्या करण्यापुर्वी दोन स्टीलच्या ताटांना तूपाचा हात लावून ठेवावा. पातेल्यात तूप गरम करावे. त्यात किसलेला गूळ घालावा. गूळ वितळला कि गॅस बंद करावा. लगेच त्यात शेंगदाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, आणि भाजलेले तिळ घालावेत आणि भराभर मिक्स करावे. लगेच वेलचीपूड आणि सुकामेवा घालावा. मिक्स करून हे दाटसर मिश्रण तूप लावलेल्या ताटात घालून थापावे. मिश्रण गरम असल्याने थापण्यासाठी एखाद्या वाटीच्या बुडाला तूप लावून त्याने थापावे.
३) मिश्रण गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.
*३)तिळाच्या मऊ वड्या*
३ वाट्या कुट ( १ वाटी दाण्याचे व २ वाट्या तीळाचे कुट), ५० ग्रम मिल्क पावडर, एक वाटी साखर व साखर बुडेपर्यंत दूध. पाक दोन तारी झाला की गॅस बंद करुन त्यात दूध पावडर व कुट घालावे. पातेल्यात हे मिश्रण थोड्यावेळ ढवळत राहावे. घट्ट झाले की तूप लावलेल्या ताटात थापावे. मिश्रण सैल वाटल्यास थोडे कुट अजून मिसळावे. अश्या पध्दतीने केलेल्या मऊ वड्या सर्वांना आवडतील.
*४)तिळाच्या वड्या*
साहित्य
१ वाटी पांढरे तीळ
१ वाटी गूळ
४-५ वेलदोड्यांची पूड
कृती :
१. तीळ मंद आचेवर भाजून घ्यावेत.
२. गूळ ग्यास वर पातळ करून घ्यावा.
३. नंतर त्यात तिळ,वेलची पूड घालून ढवळावे व तूप लावलेल्या थाळीत ओतावे. थंड होण्यापूर्वी वड्या पाडाव्यात.
*५)तिळाच्या सोप्या वड्या*
साहित्य -
१ वाटी तीळ ,
१ वाटी साखर
कृती -
प्रथम तीळ कोरडेच भाजून घ्यावेत. एका ताटाला तूप लावून तयार ठेवावे. जड बुडाच्या कढाई मध्ये साखर वितळायला ठेवावी. पाणी अजिबात घालू नये. उष्णतेने साखर पूर्ण वितळली कि पाकात तीळ टाकून नीट मिक्स करावे आणि ग्यास बंद करावा. तूप लावलेल्या ताटात मिश्रण पटापट पसरवावे . एकाद्या वाटीने सपाट करावे आणि लगेच सुरीने वड्या पाडाव्या.
ताटाऐवजी वड्या ओट्यावर पण पाडता येतील.
*६)गुळाची पोळी*
साहित्य:
सारणासाठी
१/२ किलो गूळ
१ कप बेसन
२ सुक्या नारळाच्या वाट्या
३/४ कप तिळ
१/२ कप शेंगदाणे
१/२ कप खसखस
१/२ कप तेल
आवरणासाठी
दिड कप मैदा
३/४ कप कणिक
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ
२ टेस्पून बेसन
कृती:
१) सुक्या नारळाच्या वाट्या किसून घ्याव्यात. सोनेरी रंग येईस्तोवर कोरडेच भाजावे. हाताने चुरून घ्यावे. हा चुरा आपल्याला १/२ ते ३/४ कप हवा आहे. कमी असल्यास अजून थोडं खोबरं भाजून चुरा करावा.
२) तिळ व खसखस स्वतंत्र, कोरडेच भाजून घ्यावे. बारीक पूड करून घ्यावी
३) शेंगदाणे भाजून त्याची साले काढून टाकावीत आणि एकदम बारीक कूट करून घ्यावा.
४) एका मध्यम पण जाड बुडाच्या पातेल्यात १/२ कप तेल गरम करावे. त्यात १ कप बेसन खमंग भाजून घ्यावे.
५) गूळ बारीक किसणीवर किसून घ्यावा. सर्व भाजलेले जिन्नस (तिळ, खसखस, शेंगदाणे, बेसन, सुकं खोबरं) गूळामध्ये घालून मळून घ्यावे आणि घट्ट गोळा करावा.
६) मैदा, कणिक, मिठ आणि बेसन एकत्र करावे. २ टेस्पून तेल कडकडीत गरम करून पिठात घालावे. पाणी घालून मध्यमसर घट्ट गोळा भिजवावा. लागल्यास थोडे साधं तेल घालावे. १५ मिनीटे झाकून ठेवणे.
७) सारणाचे २३ ते २५ सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे.
८) आवरणासाठी आपल्याला "१ सारण गोळ्याला २ पिठाचे गोळे" हवे आहेत त्यानुसार सारणाच्या गोळ्यापेक्षा जरा लहान असा पिठाचा गोळा करावा.
९) २ पिठाच्या लाटयांमध्ये १ सारणाचा गोळा भरून लाटीच्या कडा सिल करून बंद करावा. हाताने हलके प्रेस करून थोड्या कोरड्या पिठावर पोळी लाटावी. गुळाची पोळी एका बाजूनेच लाटावी, बाजू पलटू नये.
१०) मिडीयम हाय हिटवर तवा तापवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्याव्यात. कागदावर काढून किंचीत गार होवू द्याव्यात. एकदम गरम खावू नये, सारणातील गूळ गरम असल्याने चटका बसू शकतो.
गुळपोळी गार किंवा कोमट दोन्हीप्रकारे छान लागते. गुळपोळीवर नेहमी थोडे तूप घालून खावे म्हणजे उष्ण पडत नाही.
टीप्स:
१) पिठांचे प्रमाण आवडीनुसार बदलू शकतो. जर तुम्हाला खुडखुडीत पोळी हवी असेल तर मैदा जास्त आणि कणिककमी वापरावी तसेच गरम तेलाचे मोहनही घालावे. जर थोडी नरम पोळी हवी असेल तर फक्त गव्हाचे पिठ वापरावे आणि थंड तेलाचेच मोहन घालावे.
*७)भोगीची भाजी*
साहित्य:
१ मोठा बटाटा, सोलून मध्यम फोडी (साधारण १ ते दिड कप)
१ मध्यम वांगे किंवा ३ ते ४ भरायची लहान वांगी (साधारण १ ते सव्वा कप मध्यम फोडी)
१ कप गाजराचे मध्यम तुकडे
१/२ कप ओले चणे
१/४ कप भिजवलेले शेंगदाणे (२-३ तास भिजवणे)
१/४ कप पावट्याचे दाणे
६ तुकडे शेवगा शेंगेचे
फोडणीसाठी - २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट,१/४ टिस्पून जिरे
३-४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून भाजलेल्या तिळाचा कूट
२ टिस्पून काळा मसाला
२ टेस्पून चिंचेचा दाट कोळ
१ ते दिड टेस्पून किसलेला गूळ
१/४ कप ओलं खोबरं
चवीपुरते मिठ
कृती:
१) पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. प्रथम बटाटा, ओले चणे, पावटे, शेवग्याच्या शेंगा आणि शेंगदाणे घालून २ वाफा काढाव्यात.
२) नंतर वांगं आणि गाजर घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे.
३) भाज्या शिजत आल्या कि चिंच कोळ आणि काळा मसाला घालावा तसेच लागल्यास थोडे पाणी घालावे.
४) भाज्या शिजल्या कि गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे. लागल्यास चव पाहून मिठ घालावे. एक उकळी काढून भाकरीबरोबर गरमागरम भाजी सर्व्ह करावी.
टीप:
१) शेवग्याच्या शेंगा कोवळ्या घ्याव्यात नाहीतर त्या आतपर्यंत शिजत नाहीत. जर शेंगा जुन असतील तर त्या आधी थोड्या वाफवून घ्याव्या.
२) भाजी शिजायला थोडा वेळ लागतो. जर झटपट भाजी हवी असेल तर चणे, पावटे, शेंगा, शेंगदाणे कूकरमध्ये २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावे. परंतु भाज्या बाहेर शिजवल्यावर जो स्वाद येतो, तो कूकरमध्ये भाज्या शिजवल्यास येत नाही.
*८)बाजरीची भाकरी*
साहित्य -
बाजरीचे पीठ,
मीठ,
पांढरे तीळ
कृती -
बाजरीचे पीठ व मीठ एकत्र करून पीठ भिजवावे. त्याची भाकरी थापून तव्यावर टाकावी. जरा गरम झाली की पाणी फिरवावे. पाणी सुकले की भाकरी उलटावी. जरावेळाने उलथणे फिरवून पहावे. भाकरी तव्यावरून सुटली की तवा उतरवून गॅसवर शेकावी. छान पदर सुटेल. ही भाकरी पांढरे तीळ लावूनही करता येते.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.